राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ): राहुरी तालुक्याच्या पूर्व भागाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या राहुरी–मांजरी मार्गावर मानोरी येथील ठुबेवस्ती परिसरात मोठे भगदाड पडल्याने नागरिकांच्या प्रवासाला धोका निर्माण झाला आहे. या भगदाडामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
राहुरी–मांजरी मार्ग हा तालुक्याच्या पूर्व भागातील प्रमुख जीवनवाहिनी मानला जातो. या मार्गावरून वळण, मांजरी, नेवासा आदी भागांतील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुरू असतो. दररोज शेकडो प्रवासी, शाळकरी मुले तसेच मालवाहू वाहने या मार्गाने ये–जा करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, विशेषतः ठुबेवस्ती परिसरात तयार झालेले खोल भगदाड वाहतुकीसाठी गंभीर धोकादायक ठरत आहे.
वाहनचालकांना या ठिकाणी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खडी बाहेर आल्याने दुचाकी, जीप, ट्रॅक्टर आदी वाहनांचे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी या भगदाडाची योग्य जाणीव न झाल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. अलीकडील पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याने परिस्थिती आणखीन गंभीर झाली आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केले आहे. “राहुरी–मांजरी रस्ता हा पूर्व भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे; मात्र सध्या त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शासन व संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिक, शेतकरी संघटना आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी लवकरच या संदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन ठोस कारवाईची मागणी करण्याची तयारी दर्शविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
मानोरी परिसरातील राहुरी–मांजरी मार्गावर धोकादायक भगदाड; ग्रामस्थांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी

0Share
Leave a reply












