राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारी व गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारी टोळी अखेर पोलीस प्रशासनाने हद्दपार केली आहे. या टोळीकडून सातत्याने खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाण, गंभीर दुखापत, तसेच शस्त्रसज्ज गुन्हे केल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करत संपूर्ण टोळीला जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे.
सदर टोळीप्रमुख नितीन भाऊसाहेब कदम (वय ३२, रा. धामोरी खुर्द, ता. राहुरी), तसेच टोळी सदस्य स्वप्नील रमेश बोरुडे (वय ३१, रा. चिंचविहीरे), गणेश नामदेव आघाव (वय २४, रा. बारागाव नांदूर) आणि मिलींद दत्तात्रय हरिश्चंद्रे (वय २६, रा. तमनर आखाडा) यांनी एकत्र येऊन गुन्हेगारी टोळी स्थापन केली होती. या टोळीने श्रीरामपूरसह राहुरी परिसरात दहशत निर्माण करून गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे केले होते.
सदर टोळीवर राहुरी पोलीस ठाणे व अन्य ठिकाणी अनेक गुन्हे दाखल असून त्यामध्ये खुनाचा प्रयत्न (कलम ३०७), दरोडा (कलम ३९७, ३९९, ४०२), गंभीर दुखापत (कलम ३२४, ३२६), अग्नीशस्त्र कायदा, तसेच मुंबई पोलीस कायद्याचे कलम ३७(१)(३)/१३५ अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. टोळीने २०१५ पासून सतत अशा प्रकारचे गुन्हे केले असून पूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तरी त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती.
टोळीच्या कारवायांमुळे सर्वसामान्य नागरिक पोलिसांकडे तक्रार किंवा माहिती देण्यासही घाबरत होते. त्यामुळे भविष्यात गंभीर गुन्हे घडू नयेत म्हणून राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये या टोळीला अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावावर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर (श्रीरामपूर विभाग) यांनी चौकशी करून शिफारस केली होती. सखोल तपासानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश पारित करून टोळीप्रमुख नितीन कदम व इतर तीन सदस्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे.
पोलीस प्रशासनाने सांगितले की, “अहिल्यानगर जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या सर्व टोळ्यांवर सतत लक्ष ठेवले जात आहे. अशा टोळ्यांचा पूर्णपणे बंदोबस्त करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हद्दपारीची कारवाई सुरू आहे. लवकरच इतर गुन्हेगार टोळ्यांवरही अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.”
राहुरी तालुक्यामध्ये दहशत निर्माण करुन गंभीर दुखापत करणारी व दरोडा टाकणारी टोळी हद्दपार …

0Share
Leave a reply












