नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप : नॉन-स्टिक कुकवेअर, काळ्या प्लास्टिकची भांडी आणि प्लास्टिक पॅकेजिंगमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आरोग्यधोक्यांकडे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आज झिरो आवरमध्ये सभागृहाचे लक्ष वेधले. प्रतिबंधात्मक आरोग्य, स्वच्छता आणि नागरिकांच्या जीवनमानाला प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारच्या दिशेशी सुसंगतपणे, दैनंदिन जीवनातील या बाबींचा दीर्घकालीन जन-आरोग्यावर होणारा परिणाम गांभीर्याने विचारात घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
खा. डॉ.अजित गोपाछडे यांनी आज सभागृहात जनहिताचा अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. देशातील कोट्यवधी घरांमध्ये नॉन-स्टिक व प्लास्टिक साहित्याचा वाढता वापर होत असून, वैद्यकीय व वैज्ञानिक अभ्यासांनुसार उच्च तापमानात नॉन-स्टिक कोटिंग व प्लास्टिकमधील काही रसायने व धातू अन्नात मिसळण्याची शक्यता असल्याचे डॉ. गोपछडे यांनी नमूद केले. अशा घटकांचा दीर्घकालीन परिणाम हार्मोनल असंतुलन, प्रजननाशी संबंधित समस्या आणि काही गंभीर आजारांशी जोडला जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
अमेरिका व कॅनडा यांसारख्या देशांनी काही कुकवेअर आणि प्लास्टिक उत्पादनांबाबत आरोग्यविषयक सूचना व मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याचा संदर्भ देत, हा विषय केवळ उपभोक्ता सोयीपुरता मर्यादित नसून जन-आरोग्य संरक्षणाशी थेट संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पॅकबंद पिण्याच्या पाण्यासह फुड-ग्रेड प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये आढळणाऱ्या मायक्रोप्लास्टिक कणांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या दीर्घकालीन परिणामांवर अधिक संशोधन आवश्यक असले तरी, प्रतिबंधात्मक दृष्टिकोन स्वीकारणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतः वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून, डॉ. गोपछडे यांनी केंद्र सरकारकडे शास्त्रीय मूल्यांकन, स्पष्ट मानके, बाजारातील उत्पादनांवर नियमित देखरेख, सुरक्षित व पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन आणि व्यापक जनजागृती अभियान राबविण्याची मागणी केली. माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार या विषयावर संतुलित व वैज्ञानिक निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नॉन-स्टिक आणि प्लास्टिकमुळे किचनमध्ये छुपा धोका – राज्यसभेत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी वेधले लक्ष

0Share
Leave a reply












