SR 24 NEWS

इतर

सोनई हादरले! मातंग समाजाच्या तरुणास बेदम मारहाण, तोंडावर लघुशंकाही केली, आरएसएसचे गुंड असल्याचा वंचितचा आरोप, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Spread the love

सोनई (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सोनई गावात मातंग समाजातील युवक संजय वैरागर याच्यावर हिंदुत्ववादी काही गावगुंडांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत वैरागर यांचे हात पाय तोडण्यात आले, डोळा फोडण्यात आला, तसेच त्यांच्या अंगावर लघुशंका करण्यात आली या गंभीर अत्याचाराच्या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन संजय वैरागर यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, शहर महासचिव प्रवीण ओरे, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, तसेच संकेत शिंदे, रियाज शेख, विवेक कसबे, मनोज साळवे, सुरेश पानपाटील, शरीफ पठाण, प्रतीक जाधव, प्रतीक ठोकळ, फैरोज पठाण, भारतीय बौद्ध महासभेचे गोरख केदारे, संतोष जाधव, नितीन साळवे, अविनाश राक्षे, सचिन कांबळे, सार्थक आढाव, संजय शिंदे, पिनू भोसले, कुमार बनसोडे, दिनेश पाखरे, अजय पाखरे, श्रीकांत देठे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, संजय वैरागर यांना झालेली अमानुष मारहाण ही केवळ व्यक्तीगत नाही, तर मातंग समाजावर हल्ला आहे. या घटनेप्रमाणेच शेवगाव तालुक्यातील थाटे गावात ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ ससाणे यांनाही गावगुंडांकडून मारहाण झाली असून, त्या प्रकरणातसुद्धा आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. दोन्ही प्रकरणात पीडित हे मातंग समाजातील असून, आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे स्पष्ट दिसते. आरोपींना तात्काळ अटक करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी.

तसेच जिल्हा हा दलित – अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करून वैरागर परिवाराला पोलीस संरक्षण द्यावे. ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक व ठाणे अमलदाराला जबाबदार धरून सह आरोपी करावे, तसेच या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा. तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः वैरागर कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधून घटनेची माहिती घेतली असून, ते लवकरच अहिल्यानगर जिल्ह्याला भेट देणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेट देऊन निवेदन सादर केले असून, दलित, मातंग, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजावरील अन्यायाविरोधात तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!