SR 24 NEWS

क्राईम

चारित्र्यावर संशय घेत पतीकडून गर्भवती पत्नीचा खून ; पोलिसांकडून 24 तासांत गुन्ह्याची उकल, आरोपी पती अटकेत

Spread the love

भिगवण प्रतिनिधी (प्रवीण वाघमोडे)  : बारामती-भिगवण रोडवरील मदनवाडी परिसरात 22 ऑक्टोबर रोजी ओढ्याखाली ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला अज्ञात वस्तूचा संशयास्पद प्रकार दिसून आला. त्यातून दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांना काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आला. मदनवाडी येथील पोलिस पाटील वणवे यांनी ही माहिती तातडीने भिगवण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असता, ब्लँकेटमध्ये एका अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. मृतदेह ओळख पटविणे कठीण होते, मात्र तिच्या हातावर इंग्रजीत “Raviraj” असे नाव गोदलेले आढळले. हाच तपासाचा धागा ठरला.

या आधारे पोलिसांनी आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये हरविलेल्या व्यक्तींची नोंद तपासली असता, बारामती पोलीस ठाण्यात दीपाली सुदर्शन जाधव (रा. कटफळ) हिची हरवल्याची तक्रार 14 ऑक्टोबर रोजी दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्या पती सुदर्शन उर्फ रविराज जाधव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मृतदेहावरील गोंदलेले नाव दाखविल्यानंतर त्याने तो आपली पत्नी असल्याची कबुली दिली, मात्र त्याच्या विधानात विसंगती आढळल्याने अधिक चौकशी सुरू झाली.

सखोल चौकशीत सुदर्शनने भीषण सत्य कबूल केले. पत्नी दीपाली हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय असल्याने दोघांमध्ये 12 ऑक्टोबर रोजी वाद झाला. वादाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करून तिचा खून केला. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून स्कूटरवरून नेऊन मदनवाडी ओढ्याखाली फेकून दिला.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी मधुकर भट्टे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विनोद महागडे, स्था.गु. शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ, पोसई बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहवळे, अतुल डेरे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, अजय घुले, निलेश शिंदे, अजय देडे तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे सचिन पवार, महेश उगले, रामदास करचे, संतोष मखरे, गणेश करचे, आप्पा भांडवलकर, रणजीत मुळीक, मयूर बोबडे, विठ्ठल वारघड, वर्षा जामदार, कविता माने, शामल पवार यांनी मोलाची भूमिका बजावली. पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!