राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे कानाखाली झापड मारल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर हल्ला करून पतीला कुऱ्हाड, लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच पत्नीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे घडली आहे. ही घटना १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी घडली असून, या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोन भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दाम्पत्य राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे वास्तव्यास आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पीडित महिला व तिचे पती हे गोटुंबे आखाडा येथील एका रसवंतीवर झाडांना रंग देत होते. त्यावेळी आरोपी राजेंद्र किसन दाभाडे हा तेथे आला व “माझ्या आईला तू शिवीगाळ केली आहेस” असा राग व्यक्त करून पीडित महिलेच्या पतीच्या कानाखाली झापड मारली.
या घटनेचा जाब विचारण्यासाठी दोघे पती-पत्नी आरोपीच्या घरी गेले असता, आरोपी राजेंद्र दाभाडे आणि त्याचा भाऊ भारत दाभाडे या दोघांनी मिळून पीडित महिला व तिच्या पतीस कुऱ्हाड, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. यावेळी त्यांनी महिलेच्या अंगावरील साडी ओढून तिचा ब्लाऊज फाडला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
यानंतर पीडित महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राजेंद्र किसन दाभाडे व भारत किसन दाभाडे (दोघे रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) यांच्याविरोधात गुन्हा रजि. नं. ११४०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३ नुसार मारहाण, धमकी व विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. एम. दारकुंडे करत आहे.
गोटुंबे आखाडा येथे कानाखाली झापड मारल्याचा जाब विचारला असता पती-पत्नीवर हल्ला ; पत्नीचा विनयभंग, राहुरी पोलिस ठाण्यात दोन भावांविरोधात गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












