तुळजापूर (प्रतिनिधी : चंद्रकांत हगलगुंडे) : अतिवृष्टीने मराठवाड्यात विशेषतः धाराशिव जिल्ह्यात हाहाकार माजवला असताना, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था खऱ्या अर्थाने संकटातील लोकांच्या मदतीला धावून आली आहे. संस्थेने पूरग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करून दिलासा दिल्याने सर्वत्र तिच्या कार्याचे कौतुक होत आहे.
धाराशिव जिल्ह्यासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांचे घरदार उद्ध्वस्त झाले, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. शासनाकडून मदतीची अपेक्षा अद्याप पूर्ण झाली नसताना, पौर्णिमा संस्थेने पुढाकार घेत पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे.
संस्थेच्या वतीने पूरग्रस्त भागात अन्नधान्य, किराणा साहित्य आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी, बोरगाव देशमुख, बादोला खुर्द, काळेगाव, शिरशी, दह्याच्या आरळी आणि सीतापूर येथे ६०० शिधा किट, तर मोहोळ व धाराशिव जिल्ह्यातील विविध भागात १००० किटचे वाटप करण्यात आले. तसेच पुरामुळे शैक्षणिक साहित्य गमावलेल्या विद्यार्थ्यांना नवीन साहित्य देण्यात आले.
“आभाळ फाटले, पण सेवाभावी हात पुढे आले तर संकटातही दिलासा मिळतो,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या मदतकार्यामध्ये संस्थेच्या सचिव सुजाता उर्फ बाबई चव्हाण, व्यवस्थापक नागेश चव्हाण, तसेच गुंज संस्थाचे पदाधिकारी मयूर नागती, अजित कंकरिया व स्थानिक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.
आभाळ फाटले… पण टाके घालण्याचे काम प्रशंसनीय पौर्णिमा संस्थेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

0Share
Leave a reply












