विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरातील नागझरी, आहेरओढा, बांडे वस्ती, धुमाळ वस्ती, पानशेत, गव्हाळी, ढुसदरा,बेटवस्ती भागात सातत्याने बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्यामुळे ग्रामस्थ व वाड्या वस्त्यांवर असलेल्या शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
बिबटे नागरी वस्तीमध्ये येऊन वाढत्या पशुधनांवरील हल्ल्यांमुळे नागरीक भयभीत होऊन त्रास झाले आहेत. सायंकाळी अंधार पडल्यावर अनेकांनी घराबाहेर पडण्यास धजावत नाही. विशेष म्हणजे, परिसरात बिबट्यांची संख्या नऊ ते दहा असावी, असा ग्रामस्थांचा कायास आहे. यामुळे कायमस्वरूपी या समस्येचा तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी गव्हाळी, नागझरी परिसरात बिबट्याने पवन झावरे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला होता. तसेच आहेरओढा भागात लगतच्या माळी वस्तीपर्यंतच्या चार – पाच पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला. एवढेच नाहीतर बांडे – खोडदे शिवस्ता येथील ओढ्यात दिवसाढवळ्या बिबट्याने अनेकांना दर्शन दिले. उसाच्या शेतात तसेच रस्त्यावर बिबटे दिसत असल्यामुळे शेतात गवत घेण्यासाठी जाणाऱ्या महिलांनी बिबट्याच्या भितीने गवत घेणेही बंद केले आहे.
काही दिवसांपूर्वी गव्हाळी परिसरात बिबट्याने वासरावर हल्ला करून ठार केले होते. असेही असतानाही परिसरात अनेक ठिकाणी बिबट्यांचे दर्शन होत असल्यामुळे परिसरात बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी पवन झावरे व संजय झावरे यांनी ग्रामपंचायतीच्या मार्फत वनविभागाला केली आहे. वनविभागाने तातडीने कारवाई न केल्यास जीवितहानी होण्याची शक्यता देखील तेथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वनविभाग सुस्त अन् बिबट्याचा दररोज मस्त
बिबट्यांची भीती असल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. रात्री दहा वाजता थ्री फेज वीजपुरवठा येताच शेतकऱ्यांना सर्वप्रथम फटाके वाजवावे लागतात. त्यामुळे सर्वत्र शेत शिवारात दिवाळी असल्यासारखा धडामधूम आवाज सुरू होतो. सोबत उजेडासाठी बॅटरी आणि संरक्षणासाठी काठी घ्यावी लागत आहे. आमच्या भागात सातत्याने बिबट्या दृष्टीस पडत आहे. शेत शिवारात राहणाऱ्या कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाला पिंजरा लावावा अशी मागणी केली होती परंतु पिंजऱ्यात भक्ष्य ठेवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनाच द्यावे लागते. याअर्थी बिबट्यांच्या प्रश्नी वनविभाग अतिशय उदासीन वागताना दिसतात. याबाबत प्रशासन मात्र अतिशय सुस्त आहे.
— संदिप नाईकवाडी, स्थानिक शेतकरी
टाकळी ढोकेश्वर परिसरात बिबट्यांची दहशत वाढली, बिबट्यांची संख्या वाढल्याने ग्रामस्थांची डोकेदुखी

0Share
Leave a reply












