राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ३२ वर्षीय कामगाराचा यंत्रामध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दि. २४ सप्टेंबर रोजी बीएबीएन हर्बल इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली. मृतदेह तब्बल सहा तास यंत्रामध्येच अडकून राहिल्याने नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मृत तरुणाचे नाव भरत आसाराम माळवदे (वय ३२, रा. मोरेवाडी, वांबोरी) असे आहे. भरत माळवदे सकाळी ९.३० वाजता कामावर हजर झाला होता. कामकाज करत असताना तो अचानक कंपनीतील एका यंत्रामध्ये ओढला गेला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र मृतदेह बाहेर काढण्यास तब्बल ६ तास लागले. या काळात कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत परिसरात मोठी चर्चा रंगली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी कंपनीत धाव घेतली व मोठी गर्दी केली. दरम्यान, राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक समाधान फडोळ, हवालदार संजय राठोड, राहुल झिने, सुनिल निकम आदी पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून वांबोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
भरत माळवदे हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वांबोरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून कंपनीच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
वांबोरी येथे हर्बल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ३२ वर्षीय कामगाराचा यंत्रामध्ये अडकून मृत्यू, मृतदेह तब्बल ६ तास यंत्रातच अडकून राहिल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त

0Share
Leave a reply













