SR 24 NEWS

क्राईम

राहुरी पोलिसांकडून लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासादरम्यान खुनाचा उलगडा,  लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या क्रौर्याचा कळस – खुनाचाही गुन्हा उघड

Spread the love

राहुरी प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ ) : राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपींनीच एका सहआरोपीचा गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह पुरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या स्वयंसेविका पूजा दहातोंडे यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता राहुरी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर चार अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली होती. या अनुषंगाने बजरंग कारभारी साळुंखे (39, रा. दवणगाव, ता. राहुरी) व शितल बजरंग साळुंखे (40, रा. दवणगाव, ता. राहुरी) या दांपत्याला 18 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.

या प्रकरणातील सहआरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर (32, रा. राहता) याला अटक करायची होती. त्यासाठी न्यायालयाने दांपत्याला 24 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. तपासादरम्यान उघड झाले की, आरोपी दांपत्य अल्पवयीन मुलींचे बळजबरीने विवाह लावून त्याबदल्यात लाखो रुपयांचे व्यवहार करत होते. एका 14 वर्षीय मुलीचे लग्न पन्नाशीतील पुरुषाशी करून 1 लाख रुपये घेतले, तर दुसऱ्या 16 वर्षीय मुलीच्या लग्नासाठी 3 लाख रुपये स्वीकारल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

23 सप्टेंबर रोजी कसून चौकशीदरम्यान आरोपी बजरंग साळुंखे याने धक्कादायक खुलासा केला. त्यानुसार, सहआरोपी निलेश सारंगधर यानेही अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार केला होता. त्यामुळे मार्च 2025 मध्ये त्याच्या राहत्या घरातच गळा दाबून त्याचा खून करण्यात आला. मृतदेह दिवसभर खोलीत ठेवून रात्री पत्नीच्या मदतीने घरामागे खड्डा खोदून पुरण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली.

यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पंचासमक्ष व कार्यकारी दंडाधिकारी संध्या दळवी यांच्या उपस्थितीत दाखवलेल्या ठिकाणी खड्डा उकरण्यात आला असता मृतदेह सापडला. मृत निलेश सारंगधर हा राहता येथील असून त्याचे आईवडील दिवंगत असल्याने तो आरोपी दांपत्याकडे राहत होता. त्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार कुणी केली नव्हती. स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटली. पोस्टमार्टम केल्यानंतर नातेवाईक नसल्याने दवणगाव ग्रामपंचायतीच्या मदतीने पंचासमक्ष अंत्यविधी करण्यात आला.या प्रकरणात आरोपी दांपत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आणखी आरोपींचा सहभाग समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पो.उ.नि. राजू जाधव, पोहेकॉ सुरज गायकवाड, राहुल यादव, शकूर सय्यद, अशोक शिंदे, पो.कॉ. गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, अजिनाथ पाखरे, गोवर्धन कदम, म.पो.कॉ. मीना नाचन, वंदना पवार, शिवानी गायकवाड, अंजली गुरवे आदींचा समावेश होता.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!