विशेष प्रतिनिधी (वसंत रांधवण ) : पारनेर तालुक्यातील कर्जुलेहार्या हे ठिकाण पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेजवळ असून नगर कल्याण महामार्गावर आहे. जवळच मांडओहळ येथील अहिल्यानगर जलसंपदा विभागाचे पाटबंधारे खात्याच्या मांडओहळ मध्यम प्रकल्प शासकीय विश्रामधामची दुरवस्था झाली आहे. गेल्या ४३ वर्षांपासून मांडओहळच्या वैभवात भर टाकणारे हे विश्रामगृह शासनाची उदासीनता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेरची घटका मोजत असून विश्रामगृहाला उकीरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मांडओहळ धरणाच्या निर्मितीवेळी अधिकार्यांना धरणाची पाहणी व तपासणी करण्यासाठी पर्यटक, अभ्यासक यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून ४३ वर्षांपूर्वी विश्रामधामची उभारणी करण्यात आली. मांडओहळ धरणाचे बांधकाम सुरू झाले. त्यावेळी राजकीय नेतेमंडळी, शासकीय अधिकार्यांच्या सेवेसाठी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त विश्रामगृह कर्जुलेहार्या येथिल मांडओहळ परिसरात बांधण्यात आले. देखभाल-दुरुस्तीसाठी शासकीय कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. परिसरातील बागेसाठी माळीही कार्यरत ठेवण्यात आले. जेवण बनविण्यासाठी खानसाम्याची नियुक्तीही झाली. विश्रामधामने उत्तम सोयी-सुविधा पुरवल्या. येथील बागबगीचा सौंदर्यात भर टाकत होता.
या विश्रामगृहात एक व्हीआयपी खोली असून एक मिटींग रुम आहे. तर दोन खोल्या रहाण्यासाठी असून एक खोली स्वयंपाकाची आहे. तर विश्रामगृहाच्या समोर पटांगणात आहे. मात्र गेल्या आठ-दहा वर्षांत याचे वैभव संपुष्टात आले असून या विश्रामगृहाला उकीरड्याचे स्वरूप आले असून शासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. निर्मनुष्य विश्रामगृह असल्याने येथे बेकायदेशीर प्रकार होत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. सुरवातीच्या काळात विश्रामधामसाठी नेमण्यात आलेले खानसामा रामदास झावरे हे होते. त्यानंतर खानसामा रंगनाथ रांधवण व भाऊसाहेब जगदाळे ही जोडी प्रसिद्ध होती. रुचकर जेवणाची चव घेण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्या बैठका मांडओहळ विश्रामगृहात होत होत्या. आमदार व मंत्री यांचे दौरे नेहमी होत होते. सध्या खानसामा सेवानिवृत्त झाले. तसेच माळी, चौकीदार यांच्यासह इतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे हे विश्रामधाम सध्या कर्मचार्यांविना ओस पडले आहे. अधिकारी तर केवळ काही कार्यक्रम असेल तरच विश्रामगृहाकडे फिरकतात.
विश्रामगृहामध्ये विद्युत वायरींग खराब झाल्याने विश्रामगृह पूर्णपणे अंधारात असून विश्रामगृहातील चांगल्या प्रकारे आलेली विविध झाडे पाण्याअभावी वाळू गेली आहेत. सर्वत्र गवत झाल्याने विश्रामगृहाला उकीरड्याचे स्वरूप आले आहे. चक्क विश्रामगृहात जनावरे फिरताना दिसत आहेत. झाडांची बाग नामशेष झाली आहे. विश्रामगृहाच्या लोखंडी गेट तुटलेले आहे. अहिल्यानगर जलसंपदा विभाग पाटबंधारे विभागाच्या कार्यालयांतर्गत हे विश्रामगृह येते. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले गेले नसल्याने नेहमी गजबजलेल्या शासकीय विश्रामगृहाचा परिसर सध्या भकास झाला असून याकडे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी तालुक्यातील लोकप्रतिनिधी मांडओहळ येथील विश्रामगृहाला आलेले उकंड्याचे स्वरूप कधी घालविणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मांडओहळ येथील शासकीय विश्रामगृहाला आलेय उकीरड्याचे स्वरूप, शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष || दुरुस्तीसाठी पाठपुराव्याची मागणी

0Share
Leave a reply












