तुळजापूर, दि. २३ (प्रतिनिधी – चंद्रकांत हगलगुंडे) : परंडा तालुक्यातील वडनेर गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असताना एका कुटुंबातील चार जण पूरपाण्यात अडकले होते. या जीवघेण्या परिस्थितीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जीवाची पर्वा न करता थेट पुराच्या पाण्यात उतरून एनडीआरएफ जवानासोबत चौघांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या या धाडसाने व प्रसंगावधानाने जिल्ह्यातील जनतेत कौतुकाचा वर्षाव होत असून “लोकप्रतिनिधी असावा तर खासदार ओमराजेसारखा” अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून धाराशिव जिल्हा अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुरामुळे गंभीर संकटात सापडला आहे. गावा-गावांत पूरपाणी शिरून शेतजमीन, घरे, संसारोपयोगी साहित्य यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब रस्त्यावर आले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल काळात काही लोकप्रतिनिधी केवळ पूरग्रस्त भागांना भेट देऊन *“फोटो सेशन”*पुरते मर्यादित राहिले असताना, खासदार ओमराजेंनी थेट लोकांमध्ये उतरून दिलासा दिल्याने त्यांचे माणुसकीचे कार्य अधोरेखित झाले आहे.
भरीव मदतीची गरज – खा. ओमराजे
पूरग्रस्त भागाच्या भेटीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, “संपूर्ण जिल्हा अस्मानी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अशा वेळी पंचनाम्याचा फार्स न करता तातडीने सरसकट मदत मिळाली पाहिजे. राज्य शासनाने वाटेल तेथून कर्ज काढावे, पण शेतकऱ्यांच्या मदतीत हात आखडता कामा नये.”
शेतकरी वर्गाने देखील शासनाला तातडीने सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली असून, पंचनाम्यांच्या ढोंगाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसत आहे.
खा. ओमराजेंचे नेतृत्व-कर्तृत्वाचे जिल्हाभर कौतुक : पुरात अडकलेल्या कुटुंबातील चौघांचे वाचवले प्राण
Screenshot0Share
Leave a reply












