तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने यंदा “नऊ दिवस, नऊ दुर्गांचा सन्मान” हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय ठसा उमटवणाऱ्या नऊ प्रेरणादायी महिलांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत असून महिला वर्गातून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमासाठी जिल्ह्यातील महिलांची निवड करण्याकरिता अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये निवड झालेल्या महिलांमध्ये अणदूर येथील पौर्णिमा महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सरस्वती उद्योग समूह यांच्या अध्यक्षा सुजाता उर्फ बाबई चव्हाण यांचा समावेश असून त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे.
सुजाता चव्हाण यांनी शैक्षणिक, सामाजिक, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत महिलांना काम उपलब्ध करून देणे, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी जनजागरण, कौटुंबिक हिंसा व लैंगिक शोषणाविरोधात लढा, दारूबंदी व बालविवाह विरोधी मोहिमा, कुपोषण निर्मूलन, किशोरी मुलींसाठी प्रशिक्षण उपक्रम, शिवणकला वर्ग, बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व निराधारांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्यामुळे निराश महिलांच्या जीवनात आनंदाचे रंग भरले असून त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याशिवाय या उपक्रमात सन्मानित करण्यात येणाऱ्या दुर्गामध्ये –
अस्मिता सूर्यवंशी (गुंजोटी, ता. उमरगा)
अनिता देवकते (सौंदना आंबा, ता. कळंब)
प्रियंका पासले (तीर्थ, ता. तुळजापूर)
सरिता येळेकर (बेंबळी, ता. धाराशिव)
रोहिणी सुरवसे (वाकरवाडी, ता. धाराशिव)
नंदा जगताप (वाघेगव्हाण, ता. परंडा)
वैशाली जाधव (गणेगाव, ता. भूम)
लक्ष्मी मोरे (बेडकाळ, ता. लोहारा)
या सर्व महिलांच्या कार्याचा गौरव करताना तुळजाभवानी मंदिर संस्थानचा “नऊ दिवस, नऊ दुर्गांचा सन्मान” हा उपक्रम केवळ एक पुरस्कार वितरण सोहळा न ठरता, नव्या पिढीला प्रेरणा देणारा आणि समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाचा एक सशक्त मंच ठरत आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून ९ दिवस ९ दुर्गांचा सन्मान : महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी उपक्रम

0Share
Leave a reply












