SR 24 NEWS

इतर

शिक्षण महर्षी आलूरे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

Spread the love

तुळजापूर दि.19 (प्रतिनिधी चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शिक्षण क्षेत्रातील थोर समाजप्रबोधनकार व कार्यकर्ते म्हणून लौकिक असलेल्या शिक्षण महर्षी सि.ना. आलूरे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शनिवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे.

या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तसेच अणदूर ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र आलूरे विराजमान राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. भालचंद्र बिराजदार तसेच ऍड. लक्ष्मीकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत राज्यभरातील आंतरमहाविद्यालयीन पातळीवरील नामांकित विद्यार्थी सहभागी होणार असून, युवकांना आपली वकृत्वकला, विवेचनशक्ती आणि सृजनशीलता प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. विषयावरील सखोल अभ्यास व प्रभावी मांडणी या स्पर्धेच्या गुणवत्तेला अधिक धारदार बनवणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे तसेच संयोजन समितीने मोठे परिश्रम घेतले आहेत. राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या विशेष स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ही स्पर्धा शिक्षण महर्षी आलूरे गुरुजी यांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच ग्रामीण भागात बौद्धिक चैतन्य फुलविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!