SR 24 NEWS

जनरल

ढगफुटी सदृश धुवाधार पावसामुळे बळीराजाचे स्वप्न चक्काचूर, पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट तातडीची मदतीची मागणी

Spread the love

तुळजापूर, दि. 18 (चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर, नळदुर्ग, ईटकळ परिसरात गुरुवार, दिनांक 18 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच ते सात या दीड तासांच्या कालावधीत झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते झाले. खरीप पिकाचे स्वप्न चक्काचूर झाल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर पंचनाम्याचा फार्स न करता शासनाने सरसकट तातडीची मदत द्यावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

उत्तरा नक्षत्राने आधीच सोयाबीन, उडीद, तूर व हरभरा पिके जमीनदोस्त केली होती. त्यातच हस्त नक्षत्राच्या आगमनाने कहर केला असून ओढे-नाले, रस्ते तुडुंब वाहत आहेत. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने ‘पिकात पाणी की पाण्यात पीक’ अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा ऊस पूर्णपणे आडवा पडला असून पाण्यात तरंगताना दिसतो आहे. “गेल्या कित्येक वर्षांत असा पाऊस कधीच पाहिला नाही. सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद आणि ऊससुद्धा पाण्यात बुडाला आहे. शेतकरी अक्षरशः नागडा झाला असून शासनाने पंचनाम्याचा ढोंग न करता सरसकट मदत करावी,” अशी मागणी स्थानिक शेतकरी योगेश दिवाकर मोकाशे यांनी केली.

पावसामुळे केवळ शेतीच नव्हे तर वस्त्याही पाण्यात अडकल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील मधुशाली नगर, भुजबळ झोपडपट्टी आणि चिवारीपाटी येथील वसाहती महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे पाण्यात गुरफटल्या असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व रोष व्यक्त होत आहे.

अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे खरीप पिके पूर्णतः नष्ट झाली असून रब्बी हंगामाबाबतही मोठी शंका निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!