राहुरी वेब प्रतिनिधी ( सोमनाथ वाघ) : दारूचे लायसन्स काढण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणा, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा सागर गायकवाड (वय ३१, रा. शिरसगाव ता. श्रीरामपूर, ह.मु. कोपरे ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा विवाह दिनांक ४ मे २०१७ रोजी सागर काळू गायकवाड (रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांच्यासोबत झाला. लग्नानंतर सुरुवातीचे तीन महिने चांगले नांदले, मात्र त्यानंतर पतीच्या संशयास्पद वर्तनामुळे व घरच्यांच्या त्रासामुळे संसारात अडचणी निर्माण होऊ लागल्या.
पती नेहमी रात्री अपरात्री मोबाईलवर बोलत असल्याने विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असे. एके दिवशी मोबाईल पाहण्याचा प्रयत्न करताच त्याने दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर पती व सासू मंगल काळू गायकवाड यांनी पूजावर शारीरिक व मानसिक छळ सुरूच ठेवला. “येथे नांदायचे असेल तर माहेरहून दारूचे लायसन्स काढण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला येथे नांदवणार नाही” असे म्हणून शिवीगाळ करून उपाशीपोटी घराबाहेर काढण्यात आले.
त्रासाला कंटाळून पूजा यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पती सागर काळू गायकवाड व सासू मंगल काळू गायकवाड (रा. महाराणा प्रताप कॉलनी, शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १०४८/२०२५ भारतीय दंड संहिता कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूचे लायसन्स काढण्यासाठी दोन लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा छळ; राहुरी पोलीस ठाण्यात पती-सासूवर गुन्हा

0Share
Leave a reply












