वेब प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यात शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे तसेच ओढे–पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असून, नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
मंगळवारी पालकमंत्री विखे पाटील यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला व सरसकट पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडूरंग गायसमुद्रे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील पुल, ग्रामस्थांची घरे व दुकाने, तर देवराई व तिसगाव येथील शेतपीक व घरांचे नुकसान प्रत्यक्ष पाहिले. तसेच शेवगाव तालुक्यातील अमरापूरकर व परिसरातील नुकसानीची पाहणी करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. शेवगाव येथे स्थानिकांनी सादर केलेले लेखी निवेदनही पालकमंत्र्यांनी स्वीकारले.
पाथर्डी व शेवगाव येथील अतिवृष्टीग्रस्त भागातील सरसकट पंचनामे करण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश

0Share
Leave a reply












