(राहुरी प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सैराट प्रकरणांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. तरुण-तरुणींसह विवाहित महिलादेखील या प्रकरणांत सहभागी होत असल्याचे चित्र समोर येत आहे.विशेष म्हणजे, अनेक अल्पवयीन तरुणींचे वय १८ वर्षे पूर्ण होताच किंवा वयात अवघे काही दिवस बाकी असतानाच त्या प्रियकरांसोबत घर सोडून जात आहेत. नंतर वय पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी थेट आळंदी येथील विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन कायदेशीररीत्या विवाह नोंदणी करून घेत आहेत. त्यानंतर संबंधित जोडपी थेट पोलीस ठाण्यात हजर राहून माहिती देत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
या घटनांमुळे पालक वर्गामध्ये मोठी चिंता व मानसिक त्रासाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा मुली स्वतःच्या पालकांविरोधात उभ्या राहत असल्यामुळे घराघरात कलह वाढत आहे. केवळ तरुण-तरुणी नव्हे तर विवाहित महिलादेखील घर सोडून जाण्याच्या घटना वाढल्याने संबंधित कुटुंबांना सामाजिक व मानसिक धक्क्याला सामोरे जावे लागत आहे.
या वाढत्या प्रवृत्तीमुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पालक, समाज व प्रशासन यांच्यासमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. यावर उपाय म्हणून शाळा व महाविद्यालयांमध्ये मुलींचे समुपदेशन करणे, पालकांच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
राहुरी तालुक्यात सैराट प्रकरणांची वाढ : तरुण-तरुणींसह विवाहिताही सहभागी, फरार जोडपी थेट विवाह नोंदणी करुन पोलीस ठाण्यात हजर होत असल्याने पालक चिंतेत

0Share
Leave a reply












