तुळजापूर, दि.१४ (चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर येथील जैन समाजाच्या वतीने दि. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत दशलक्षण धर्म पर्व मोठ्या श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम अकिंचन्य, उत्तम सत्य व उत्तम ब्रह्मचर्य या दहा धर्मविषयांवर आधारित प्रवचनमालेत व्याख्यात्या बा.ब्र.वैशाली बिराजदार यांनी दैनंदिन प्रबोधन केले.
या धर्मतत्त्वांचे पालन केल्यास अखिल मानवजातीचे कल्याण होईल, असा संदेश त्यांनी आपल्या प्रभावी शैलीत दिला. “अहिंसेचेच समर्थन सर्व धर्मग्रंथांत केलेले आहे. हिंसेला कोणत्याही धर्मात स्थान नाही,” असे सांगून त्यांनी जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्वज्ञानावर प्रकाश टाकला.
बालवयोगटातील मुलामुलींसाठी प्रश्नमंजुषा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच श्राविकांसाठी अष्टक द्रव्य, सोळा सती स्पर्धा अशा विविध उपक्रमांतून धार्मिक प्रबोधन घडविण्यात आले. या उपक्रमांना बालगोपाळ व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी ट्रस्टी मंडळ अध्यक्ष डॉ. अमरदीप कंदले यांच्यासह भालचंद्र कंदले, रमेश कंदले, सुनील कस्तुरे, अक्षय कस्तुरे, वालचंद कंदले, प्रसन्न कंदले, अतुल कस्तुरे, प्रज्योत मेळवंकी, ऋतिक कंदले यांनी परिश्रम घेतले.
मंदिर विकास निधीसाठी श्रावक विजयकुमार खोबरे व ज्येष्ठ श्राविका पद्मावती सुदर्शन कस्तुरे यांनी प्रत्येकी रु.५,०००/- चे योगदान दिले. तसेच अनंत रोटच्या माध्यमातून ज्येष्ठ श्रावक सुहास हिराचंद कंदले यांनी महाप्रसादाचे आयोजन केले. येत्या वर्षी २०२६ मध्ये होणाऱ्या पर्युषण पर्वात अनंत रोटच्या माध्यमातून महाप्रसाद देण्याची जबाबदारी श्रावक सुरेंद्र जयपालराव सगरे यांनी जाहीर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ श्रावक चंद्रशेखर कंदले यांनी केले. पर्युषण पर्वातील उपक्रम दरवर्षी राबविण्याचा संकल्प मंदिर ट्रस्टने व्यक्त केला.
दशलक्षण धर्माची शिकवण अखिल मानव जातीला तारक – बा.ब्र.वैशाली बिराजदार, विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणही संपन्न दरवर्षी असे उपक्रम राबवण्याचा मंदिर ट्रस्टचा संकल्प

0Share
Leave a reply












