अणदूर वेब प्रतिनिधी दि.15 (चंद्रकांत हगलगुंडे) : प्राथमिक आरोग्य स्तरावरील आशा व आरोग्य कार्यकर्त्यांनी जर महिलांची नियमित तपासणी केली तर स्त्रियांमधील स्तनाचा कर्करोग 15 ते 30 टक्के पर्यंत कमी होऊ शकतो असे प्रतिपादन संभाजीनगर येथील स्तन कर्करोग तज्ञ डॉ अरुणा कराड यांनी केले. आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव, एम. जी.एम. वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर व हॅलो मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आशा कार्यकर्त्यांच्या स्तनाचा कर्करोग तपासणी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.
भारतामध्ये स्तनाचा कर्करोग झपाट्याने वाढत आहे. बऱ्याच प्रमाणात या कर्करोगाचे निदान अत्यंत उशिरा होते. त्यामुळे आरोग्य संबधी अनेक जटील समस्या निर्माण होतात. परंतु आशा कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील महिलांची वर्षातून किमान एकदा स्तनाची तपासणी केल्यास हे प्रमाण 15 ते 30 टक्के पर्यंत कमी होऊ शकते असे टाटा कर्करोग रुग्णालय मुंबई यांनी एका संशोधनातर्फे सिद्ध केले आहे…
अणदूर येथे दि 13 सप्टेंबर 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अणदूर व जळकोट अंतर्गत कार्यरत आशा कार्यकर्त्यांचे कर्करोगासाठी स्तन तपासणी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी स्तनाचा कर्करोग तपासणी संबंधित प्रशिक्षण दिले व प्रात्यक्षिक डॉ. अरुणा कराड यांनी उपस्थित सर्व अशांना करून दाखवले या प्रशिक्षणात सुमारे 65 अशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्या. या स्तुत्य उपक्रमांचा व प्रशिक्षणाचा लाभ सर्व आशा कार्यकर्त्यांनी घ्यावा असा आदेश काढून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हरिदास व सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कुलकर्णी यांनी सर्व आशा ना सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. क्रांती रायमाने यांच्या सह संस्थेतर्गत विविध प्रकल्पाचे समन्वयक व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. क्रांती रायमाने यांनी तर सूत्रसंचालन बसवराज नरे यांनी केले आभार जावेद शेख यांनी मानले.
Leave a reply














