संगमनेर (प्रतिनिधी) : कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.21) संगमनेरमध्ये विविध संघटना व महाविकास आघाडीच्या वतीने शांती मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले, “संगमनेर तालुक्याचा विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी काही लोकप्रतिनिधी गावगुंडांना हत्यार म्हणून वापरत आहेत. तालुक्यात वाढणाऱ्या दहशतवादाला वेळीच आळा घालावा,” असे आवाहन त्यांनी केले.
थोरात म्हणाले, “चाळीस वर्षांमध्ये सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण करून तालुका राज्यात अग्रस्थानी आणला. मात्र, मागील आठ महिन्यांत गुंडगिरी वाढली आहे. लोकप्रतिनिधी हिंदुत्वाच्या नावाखाली दिशाभूल करत असून कीर्तनाचा वापर राजकारणासाठी करीत आहेत. खरे हिंदुत्व हे मानवतेच्या विचाराने चालते. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे.”
दरम्यान, आमदार सत्यजीत तांबे यांनी या मोर्चात भाषण करताना म्हटले की, “संगमनेर तालुक्याचा झालेला विकास हा बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाला आहे. हिंदुत्व म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणे. जातीयवाद व नथुराम गोडसेचे उदात्तीकरण आम्ही कदापि मान्य करणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न होऊ नये.”
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “नवीन आमदाराचे तथाकथित हिंदुत्व हे दिखाऊ आहे. आपण वारकरी संप्रदायाचे खरे हिंदू आहोत. नथुराम गोडसे हा आपला आदर्श नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा मानवतेच्या विचाराने पुढे जात आहे आणि तो मार्ग आपण स्वीकारला आहे.”
कीर्तनकार भंडारे यांच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये शांती मोर्चा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप

0Share
Leave a reply












