पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. या निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून, जरांगे यांनी मराठ्यांचा आरक्षणाच्या लढ्यात विजय झाला असे भावनिक उद्गार काढले.
या विजयाच्या आनंदात अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वासुंदे गावात मराठा ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि उत्साहपूर्ण वातावरणात आनंदोत्सव साजरा केला. गावकऱ्यांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक यशाचा जल्लोष केला. यावेळी बापूसाहेब गायखे, अभिनव पाटोळे, आदित्य शिर्के, गणेश बर्वे, राजेश सावंत, अजित झावरे, भाऊसाहेब झावरे, नितीन शिंदे, बबलू शिंदे, संदीप खंडाळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी मराठा समाजाच्या एकजुटीचे आणि जरांगे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
या यशामुळे मराठा समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. वासुंदेसह राज्यभरातील मराठा समाज आता पुढील आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. जरांगे यांनीही सरकारला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मराठ्यांचा विजय हीच खरी एकजुटीची ताकद : बापूसाहेब गायखे
मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. या लढ्यात मनोज जरांगे यांनी उपोषण, मोर्चे आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणले. सरकारने मागण्या मान्य केल्याने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. वासुंदे गावातील ग्रामस्थांनी हा विजय समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. आमच्या पिढ्यांना याचा फायदा होईल, ही खरी एकजुटीची ताकद आहे, असे बापूसाहेब गायखे म्हणाले.
मराठा आरक्षणाचा विजय: मनोज जरांगे यांनी मागे घेतले उपोषण, पारनेर मधील वासुंदेत आनंदोत्सव

0Share
Leave a reply












