राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करुन देणार्या हॉटेल, लॉज मालक, चालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून त्यात त्यांना आरोपी करण्यात येणार असल्याची माहीती अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकाद्वारे दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर (अठरा वर्षाखालील) कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल, असा लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती हा आरोपी असतो.
परंतू, याच कायद्यातील काही कलमानुसार असा अत्याचार करणे सोपे होईल, अशा स्वरूपाची मदत करणारा देखील सहआरोपी असतो. त्यालाही मुख्य आरोपी इतकीच शिक्षा असते. म्हणजेच अशा स्वरूपाच्या अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक, हॉटेल, लॉज चालक-मालक आदींवरही कारवाई होते. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशन येथे बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीने लैंगिक अत्याचारासाठी दोन वेगवेगळे लॉजचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दोन्हीही लॉज, हॉटेल चालक यांना सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आले आहे.
श्रीरामपूर विभागात अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या अंतर्गत 17 पोलीस स्टेशन येतात. या सतरा पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचाराखालील दाखल व तपासावर असणार्या गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये जर कोणी हॉटेल, लॉज चालक-मालक याने निष्काळजीपणे संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील, हॉटेल किंवा लॉज उपलब्ध करून दिला असेल, तर त्यांना देखील गुन्ह्यांमध्ये सहआरोपी करण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
यापुढे अशा स्वरूपाच्या दाखल होणार्या गुन्ह्यांमध्ये जर हॉटेल किंवा लॉज, कॅफेचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित हॉटेल, कॅफे, लॉज चालक-मालक यांना देखील सहआरोपी करण्यात येईल. त्यामुळे सर्वच हॉटेल, लॉज चालकांनी आपल्या हॉटेल, लॉज मध्ये येणार्या व्यक्तींची रजिस्टरमध्ये नोंद करावी, त्यांच्या वयाची पडताळणी करावी, यासंबंधीचा पुरावा आपल्या अभिलेखावर ठेवावा, किरकोळ स्वरूपाच्या आर्थिक फायद्यासाठी वरील सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
श्रीरामपूर विभागामध्ये संगमनेर, लोणी, कोपरगाव, सोनई त्याचप्रमाणे अन्य शहरामध्ये मोठी शैक्षणिक संकुले आहेत. त्यामध्ये राज्यभरातून मुले-मुली शिक्षणासाठी येत असतात. बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी हे अल्पवयीन असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वरीलप्रमाणे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी लॉज, हॉटेल उपलब्ध करून देणार्या चालकांवर, मालकांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.
– सोमनाथ वाघचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक
लैंगिक अत्याचारासाठी जागा देणार्या लॉज, हॉटेल चालकांवर कारवाई होणार, अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती

0Share
Leave a reply












