नांदेड प्रतिनिधी / धम्मदीप भद्रे : पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी असलेले शासकीय सर्व नियम बाजूला सारून या भागातील प्रत्येक नागरिकाला तातडीने मदत करावी अशी मागणी खा. डॉ.अजित गोपछडे यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली आहे . अतिवृष्टीग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली असता, या बैठकीत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी अनेक सूचना मांडल्या.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील रावणगाव, हसनाळ , भेंडेगाव , भिंगोली आदी गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. पाच जणांचा बळी घेणाऱ्या या अतिवृष्टीच्या पुराने शेकडो जनावरांनाही मृत्यूच्या दाढेत ओढले आहे. सर्वत्र हाहाकार उडाला. भयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे . अशा परिस्थितीत या भागातील भयग्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी कालच 20 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
त्यानंतर आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी अनेक सूचना मांडल्या. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनाच्या ज्या काही सूचना असतील आणि ज्या काही अटी असतील त्या सर्व अटी बाजूला ठेवून शिथिल करुन प्रत्येक बाधित नागरिकाला राज्य सरकारने मदत करावी . पूरग्रस्त भागातील कोणताही नागरिक , कोणतीही महिला मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी बैठकीत केली . गरज पडल्यास आपण केंद्र सरकारशी बोलून आपतग्रस्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करू मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन शासनाचे निकष आणि नियमाला थोडे बाजूला करून विशेष बाब म्हणून या भागात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान बैठकीत बोलताना खा. डॉ. अजित गोपछडे म्हणाले की , अतिवृष्टी आणि पुरामुळे या गावांमध्ये प्रचंड भयानक अवस्था निर्माण झाली आहे. नागरिकांना खाण्यासाठी अन्न नाही. पिण्यासाठी पाणीही उरले नाही अशी परिस्थिती असतानाच आता येथे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. रोगराई पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता येथे आरोग्य यंत्रणा सक्रिय करावी.
प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची तसेच मानसिक अवस्थेची काळजी घेण्यासाठी दक्षता घेतली जावी, कौन्सिलिंग समुपदेशन करुन मानसिक आधार द्यावा. आरोग्य विभागाने सतर्क रहावे. पालकमंत्र्यांनी येथे अधिकचा कर्मचारी वर्ग आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदेशित करावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
शासकीय नियम बाजूला सारून पूरग्रस्तांना मदत द्या : खा. डॉ. अजित गोपछडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

0Share
Leave a reply












