SR 24 NEWS

सामाजिक

राहुरी फॅक्टरीत शिक्षिकांकडून स्वामी विवेकानंदांच्या विचारांची भेट देऊन नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत

Spread the love

राहुरी फॅक्टरी  (प्रतिनिधी )  राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नव्याने इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. या स्वागत उपक्रमात विद्यालयाच्या शिक्षिका प्रा. संगीता गणेश भांड-गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या बोधवचने असलेली पुस्तके भेट दिली.

या वर्षी कला व विज्ञान शाखेतील नवोदित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात सकारात्मक विचारांपासून व्हावी, आत्मविश्वास वाढावा आणि जीवनमूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचे पुस्तक वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या आचार-विचारात सकारात्मक बदल घडावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास प्राचार्य उत्तमराव खुळे, विविध विषयांचे शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत समारंभात प्रा. भांड-गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, संयम आणि ध्येयवादी जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले.

विद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, समाजात अशा सकारात्मक प्रयत्नांची गरज असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा प्रयत्न निश्चितच मोलाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!