राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : माती व पाण्याचा पीएच हा पिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. योग्य पीएचमुळे खतांची मात्रा योग्य प्रमाणात पिकांना उपलब्ध होते. यासाठी माती व पाण्याचे परीक्षण करूनच पिकांना खते देणे शेतकर्यांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर महाविद्यालयातील मृदाशास्त्र विभागामध्ये चार दिवसीय माती व पाण्याची चाचणीमधील विश्लेषणात्मक तंत्रे या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, प्रशिक्षण कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. श्रीगणेश शेळके व डॉ. रितु ठाकरे उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रशांत बोडके म्हणाले की दिवसेंदिवस जमिनीची प्रत खराब होत आहे. आपल्या पुढच्या पिढीला शेतीतून चांगले उत्पादन मिळण्यासाठी जमिनीचे आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे. पिकांद्वारे खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परीक्षण करुन खते देणे गरजेचे आहे. आपण जसे आपले आरोग्य जपतो तसेच माती व पाण्याचे आरोग्य जपण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले पाहिजेत. या प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींनी माती व पाणी तपासणी करण्याबरोबरच शेतकर्यांना त्याविषयीचे योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. कांबळे म्हणाले की जमिनीची सुपीकता महत्त्वाची असून ही सुपीकता दिवसेंदिवस कमी होत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी माती व पाण्याचे परीक्षण करुन त्यानुसार खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. देशामध्ये 8272 माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा असून आपल्या राज्यात 587 माती व पाणी परीक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत. माती व पाणी परीक्षणाचा अचूक अहवाल मिळाल्यास त्यायोगे खतांची योग्य मात्रा देणे शक्य होते व त्यामुळे खतांमध्ये बचत होऊन जमिनीचे आरोग्य संवर्धनास मदत होते. दिवसेंदिवस जमीन धारण क्षेत्र कमी होत असल्याने जमिनीची सुपीकता अती महत्वाची आहे. यासाठी माती व पाणी परीक्षणाचे महत्व आधोरेखीत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मृदशास्त्र विषयावरील पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी दहा जिल्ह्यातून कृषि विज्ञान केंद्र, विद्यापीठातील मृदा शास्त्र विषयातील अधिकारी, खाजगी माती तपासणी प्रयोगशाळेतील कर्मचारी असे 25 प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रितू ठाकरे यांनी तर आभार डॉ. श्रीगणेश शेळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी आंतरविद्या शाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. सचिन सदाफळ, मृदाशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Homeकृषी विषयीमाती व पाण्याचे परीक्षण करूनच पिकांना खते देणे शेतकर्यांसाठी फायदेशीर – विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे
माती व पाण्याचे परीक्षण करूनच पिकांना खते देणे शेतकर्यांसाठी फायदेशीर – विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे

0Share
Leave a reply











