पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर शहरालगतच्या तलावाजवळ गुरुवारी (३१ जुलै) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुरेखा दत्तात्रेय औटी (वय ४२) व शिवांजली दत्तात्रेय औटी (वय २१) अशी या मृत माय-लेकींची नावे आहेत. मृत सुरेखा यांचे पती दत्तात्रेय औटी यांचे पाच महिन्यांपूर्वी पारनेर-सुपे रस्त्यावर झालेल्या एका अपघातात निधन झाले होते. पारनेर शहरात वास्तव्यास असलेल्या सुरेखा व शिवांजली या मायलेकी नेहमीप्रमाणे शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या आपल्या शेतीत काम करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता गेल्या होत्या.
मात्र, सायंकाळचे सात वाजून गेले, तरी त्या घरी परत न आल्याने सुरेखा यांचा मुलगा तेजस याने शेताजवळ राहणाऱ्या आपल्या चुलत्यांना संपर्क करून आई व बहीण घरी आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी, शेजाऱ्यांनी या दोघींचा शोध सुरू केला; परंतु उशिरापर्यंत शोध न लागल्याने रात्री ११ वाजता पारनेर पोलिस ठाण्यात या दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली.
त्यानंतर पोलिस पथकाने सुरेखा यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, तलावाजवळ त्यांचा मोबाईल आढळून आला. त्यावरून पोलिस व नातेवाइकांनी तलाव परिसरात शोध घेतला असता, रात्री दीड वाजता सुरेखा यांची पिशवी तलावाच्या काठावर आढळली. काही अंतरावर तलावाच्या डोहात सुरेखा व शिवांजली यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढून टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. शुक्रवारी (१ ऑगस्ट) शवविच्छेदन झाल्यानंतर दोघींच्या मृतदेहावर दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेखा औटी यांचा मुलगा तेजस हा नुकताच बारावी पास झाला आहे. पाच महिन्यांपूर्वी तेजसच्या वडिलांचे छत्र हरपले, तर आता आई व बहीणही सोडून गेल्याने १८ वर्षीय तेजसवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तो आज पोरका झाला.
पतीच्या अपघाती निधनामुळे नैराश्यग्रस्त पत्नीची मुलीसह तलावात उडी मारून आत्महत्या,वडिलांचे छत्र हरपले व आता आई व बहीण सोडून गेल्याने तेजस झाला पोरका

0Share
Leave a reply












