SR 24 NEWS

सामाजिक

झेप प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम – शहरातील विद्यार्थ्यांची दुर्गम भागातील शाळेला माणुसकीची भेट

Spread the love

ठाणे प्रतिनिधी / किशोर खामगळ : ठाणे येथील अंबर इंटरनॅशनल विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कर्जत तालुक्यातील भीमाद्री विद्यालय या आदिवासी भागातील शाळेला दिलेली भेट ही केवळ साहित्यदानापुरती मर्यादित नव्हती, तर ती एक माणुसकीची नाळ जोडणारी आणि मूल्यांची शिकवण देणारी सुंदर यात्रा ठरली.

या भेटीदरम्यान अंबर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भीमाद्री शाळेसाठी ७०० वह्या, १९१ ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिली, तसेच दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपणाचा उपक्रम हिरीरीने राबवला. मातीला हात लावत, झाडांची लागवड करत आणि एकत्र खेळत असताना विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आपुलकी आणि सहवेदनेचे नाते निर्माण झाले.

या भेटीदरम्यान अंबर विद्यालयातील शिक्षक शाहीन मॅडम, स्वाती मॅडम आणि सरोज मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक असमतोल स्पष्ट करत, त्यातून कृतज्ञता आणि सेवा भावनेचं महत्त्व समजावून सांगितले. शहरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत जाणिवा निर्माण होत असतानाच, दुर्गम भागातील मुलांच्या संघर्षमय शिक्षणप्रवासाचे भानही प्राप्त झाले.

झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास धनवडे यांनी सांगितले की, “या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरी जीवनमूल्यं – दया, सहानुभूती, संघर्ष आणि कृतज्ञता शिकायला मिळाली. दोन्ही शाळांतील मुलांनी मिळून घालवलेला हा दिवस त्यांच्या स्मरणात सदैव राहील.”

भीमाद्री विद्यालयाचे शिक्षक आणि पालकांनी अंबर शाळेच्या विद्यार्थ्यांचे आणि संपूर्ण शिक्षकवृंदाचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील मुलांनी आमच्यापर्यंत पोहोचून जो विश्वास, प्रेम आणि मदतीचा हात दिला, तो आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!