राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ ): राहुरी तालुक्यातील कात्रड येथील दांगटवस्ती परिसरात रात्रीच्या वेळी घरात घुसून वृद्धावर हल्ला करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी गजाबापु नाथु दांगट (वय ८५, रा. दांगटवस्ती, कात्रड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) हे दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कुटुंबासह घरी झोपलेले असताना चार अनोळखी आरोपींनी कशाच्या तरी सहाय्याने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. धारदार हत्याराचा धाक दाखवून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना मारहाण करत सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन असा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला.
या घटनेप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १४३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(६) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपी जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले.
पथकाने घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन व माहिती मिळवली. व्यावसायिक पद्धतीने तपास करत असताना दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी माहिती मिळाली की सदर गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रघुवीर विरुपन भोसले (रा. घासगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याने त्याच्या साथीदारांसह केला असून ते नेवासा फाटा परिसरात आले आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेवासा फाटा येथे सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे १) रघुवीर विरुपन भोसले (वय १८) व २) दिनेश विरुपन भोसले (वय २३, दोघे रा. घासगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी सांगितली. सखोल चौकशीत आरोपी रघुवीर भोसले याने सदर गुन्हा आपण व त्याचे साथीदार दिनेश भोसले, तिरंगा कडू उर्फ फादर काळे, बदाम कडू उर्फ फादर काळे, महेश नंदन उर्फ नंदू काळे व आवकाश गोपीनाथ काळे (सर्व रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी मिळून केल्याची कबुली दिली.
तसेच या टोळीने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, पाथर्डी व शेवगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यापूर्वीही जबरी चोरी व इतर गंभीर गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रघुवीर भोसले याच्यावर अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून तो काही गुन्ह्यांमध्ये फरार होता.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नं. १४३३/२०२५ अन्वये पुढील तपासासाठी हजर करण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मा. श्री. सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.
राहुरी तालुक्यातील कात्रड येथील दांगटवस्ती परिसरात रात्री वृद्धावर हल्ला करत जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

0Share
Leave a reply












