SR 24 NEWS

क्राईम

श्रीरामपुर शहरात घरफोडी करणारे रेकॉर्डवरील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद, सराईत आरोपी निघाले देवळाली प्रवरातील

Spread the love

श्रीरामपुर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपुर शहरात मध्यरात्री घरफोडी करून सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या पथकाने जेरबंद केले असून, एक आरोपी फरार आहे.या घटनेची हकिगत अशी की, फिर्यादी मोहंमद रफिक शेकलाल शेख (रा. अतिथी कॉलनी, वार्ड क्र. १, श्रीरामपुर) हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १२.२० वाजण्याच्या सुमारास घरी परत आले असता त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक अज्ञात चोरट्यांनी तोडल्याचे आढळून आले. घरातील लॉकर व कपाटातून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ, तीन मोबाईल फोन, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण सुमारे २,१०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ११११/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पो.नि. कबाडी यांनी पोउपनि. संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, रमीजराजा अत्तार, विशाल तनपुरे, भगवान थोरात, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड आदींचे विशेष पथक तयार करून तपासाची जबाबदारी सोपवली.

पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती संकलित केली असता, सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शब्बीर शेख (वय २८, रा. खटकळी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याने त्याच्या दोन साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी समीर शेख यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हा गुन्हा जैद उर्फ सरफराज मुश्ताक सय्यद (वय २२, रा. इस्लामपुरा, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) व विजय उर्फ खंडु इथापे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी – फरार) यांच्यासह केल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने जैद उर्फ सरफराज सय्यद यालाही अटक केली असून विजय इथापे हा अद्याप फरार आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी समीर शब्बीर शेख याच्याविरुद्ध यापूर्वी पारनेर (गु.र.नं. ९०२/२०१९) व सोनई (गु.र.नं. ३००/२०२३) पोलीस ठाण्यात चोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत. तसेच जैद उर्फ सरफराज सय्यद याच्याविरुद्ध राहुरी, नेवासा (अहिल्यानगर) व गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. ताब्यातील दोन्ही आरोपींना श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. ११११/२०२५ अंतर्गत पुढील तपासासाठी हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करत आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!