शिर्डी प्रतिनिधी : जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड झाला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
शिर्डी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास प्रदान करण्यात आलेल्या २८ नवीन चारचाकी वाहनांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून गुन्हेगारांकडून अद्ययावत शस्त्रे व इंटरनेटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण करणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यातील विविध आर्थिक घोटाळ्यांमुळे जिल्ह्याची प्रतिमा डागाळत असून, अशा प्रकरणांतील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचून तात्काळ व कठोर कारवाई झालीच पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
श्रीरामपूर येथील गोळीबाराची घटना तसेच देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ जमणारा जमाव समाजासाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद करून, गुटखा व अवैध व्यवसायातून येणारा पैसा गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली. जिल्ह्यात वाढलेला अमली पदार्थांचा विळखा आणि बेकायदेशीर शस्त्रांचा वावर रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहिमा राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
पोलीस दलाच्या सुविधा वाढविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे सांगत, अहिल्यानगर शहरात ३२२ कोटी रुपये खर्चाचे पोलीस निवासस्थान संकुल उभारण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी सर्व तालुक्यांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी देण्यात येणार असून, उपविभागीय स्तरावर अत्याधुनिक ‘कमांड सेंटर’ उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. समृद्धी महामार्गासह राष्ट्रीय महामार्गांवर अपघात झाल्यास तातडीची मदत पोहोचविण्यासाठी या नवीन वाहनांचा मोठा उपयोग होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यात मुंबई वगळता राज्यात सर्वाधिक, म्हणजे वर्षाला सुमारे १७ हजार गुन्हे दाखल होतात. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार तसेच शिर्डी व शनिशिंगणापूरसारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच ‘११२’ आपत्कालीन क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या वाहनांमुळे मोठी मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोपरगाव व पाथर्डी येथील नवीन पोलीस ठाण्यांची कामे पूर्ण झाली असून राहाता, नेवासा व राहुरी येथील बांधकामे प्रगतीपथावर आहेत. श्रीगोंदा व श्रीरामपूर येथील कामांनाही गती मिळाल्याने पोलीस प्रशासनाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्री थोरात, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात २८ नवीन वाहने दाखल

0Share
Leave a reply












