तुळजापूर प्रतिनिधी / चद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील चिवरी पाटी ते सिद्धार्थ नगर वस्तीला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर साचलेल्या कचऱ्यामुळे व तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही घाण २६ जानेवारीपर्यंत तात्काळ हटवावी, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आर. एस. गायकवाड यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अणदूर ही तालुक्यातील प्रतिष्ठेची व मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. १९९३ च्या प्रलयंकारी भूकंपानंतर जुना भीमवाडा परिसरातील बहुतांश कुटुंबे सध्याच्या सिद्धार्थ नगर (वत्सला नगर) येथे वास्तव्यास आहेत. या वस्तीच्या शेजारीच जिल्ह्यातील आदर्श जिल्हा परिषद शाळा असून येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
दररोज या रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थी व नागरिकांना नाक दाबून चालावे लागत आहे. कचऱ्याचे ढीग व दुर्गंधीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी १० डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन ही गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याची दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी तडजोड न करता तात्काळ कचरा हटवून रस्ता दुर्गंधीमुक्त करावा; अन्यथा २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्यात येईल, असा ठाम इशारा आर. एस. गायकवाड यांनी दिला आहे.
चिवरी पाटील–सिद्धार्थ नगर रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य हटवा; अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा

0Share
Leave a reply












