सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारात सध्या खरेदी-विक्रीला मोठा अडथळा निर्माण झाला असून, तथाकथित गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनांच्या दहशतीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडवून, गोवंश हत्याबंदीचा धाक दाखवत काही व्यक्ती गाड्या फोडतात, चालक-मालकांना मारहाण करतात, खरेदीच्या पावत्या फाडून टाकतात, तसेच पैशांची मागणी करतात, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. यामुळे जनावरांची वाहतूक, खरेदी-विक्री अवघड व जोखमीची झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेंडी बायपास, सोलापूर बायपास, नागापूर एमआयडीसी, कल्याण बायपास या ठिकाणी अशा घटना घडत असल्याचे नमूद करून, या प्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुरेशी समाज व व्यापारी वर्गाने केली आहे. या संदर्भात घोडेगाव उपबाजार आवारात व्यापाऱ्यांच्या वतीने सोनई पोलीस ठाण्याचे एपीआय विजय माळी आणि कृ.उ.बा. समिती नेवासा सचिव देवदत्त पालवे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पशुसंवर्धन विभाग, पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन देताना अशोक एळवंडे, माजी सरपंच बाळासाहेब सोनवणे, राजेश रेपाळे, रवि बर्डे, अजीम शेख, सईद शेख, सत्तार शेख आदींसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. व्यापाऱ्यांनी या वेळी स्पष्ट मागणी केली की, वाहतूक परवाने, वैद्यकीय दाखले व खरेदी पावत्यांसह बाजार समितीकडून अधिकृत वाहतूक प्रमाणपत्र द्यावे. तसेच कत्तलखान्यांना परवानग्या द्याव्यात. भाकड जनावरांबाबत काय करायचे यावरही स्पष्ट धोरण हवे, अशी मागणी करण्यात आली.
सोनई पोलीस ठाण्याचे एपीआय विजय माळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यापाऱ्यांनी नियमाप्रमाणे वाहतूक परवाना, वैद्यकीय दाखले व पावत्या बाळगाव्यात. गोवंशात फक्त गायी नव्हे तर म्हशींचाही समावेश असून व्यापारी व वाहतूकदारांनी बनावट परवाने वापरू नयेत. व्यापारी वसंत सोनवणे म्हणाले की, “दुभत्या आणि गाभण जनावरांना अडवले जाते, नाहक त्रास दिला जातो. आम्ही हिंदुत्ववादी असूनही गोशाळा चालवतो, परंतु सध्याची परिस्थिती फारच बिकट झाली आहे.
“व्यापारी असोसिएशनचे अशोक एळवंडे यांनी सांगितले की, “भाकड जनावरे विकण्यास बंदी आहे, ऊस शेतात टनाला चार हजार रुपये कसे ठरवायचे? दुभती व गाभण जनावरे हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे, पण गोवंश हत्या कायद्यामुळे परिस्थिती कठीण झाली आहे.”
बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले की, “सध्याच्या अडचणी लक्षात घेता बाजार समिती व्यापाऱ्यांना नियमानुसार सहकार्य करेल. जनावरांची आवक घटल्याने महसूलात घसरण झाली आहे. लवकरच व्यापाऱ्यांसाठी हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात येईल.”
घोडेगाव जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्री मंदावली ; तथाकथित गोरक्षकांकडून अडथळे, व्यापाऱ्यांचे निवेदन

0Share
Leave a reply












