प्रतिनिधी / रोशन खानकुरे : इंदिरा गांधी विद्यालय, पालेबरसा येथे अनेक वर्षे गुणवत्तापूर्ण अध्यापन करणारे आणि विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवलेले आदरणीय शिक्षक श्री सोपान चहांदे सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप समारंभ आज दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी उत्साहात व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री के. ए. शेन्डे, मुख्याध्यापक श्री लोखंडे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक, माजी विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चहांदे सर हे त्यांच्या मनमिळाऊ स्वभावासाठी, अभ्यासू वृत्ती आणि विद्यार्थ्यांवर असलेल्या प्रेमळ दृष्टीकोनासाठी प्रसिद्ध होते. अध्यापन कार्यात त्यांनी नेहमीच नवीन प्रयोगशीलता आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजवण्यावर भर दिला. त्यांनी आपले संपूर्ण कार्यकाल निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत शाळेचे नाव उंचावले.
समारंभात बोलताना संस्थेचे सचिव श्री शेन्डे यांनी चहांदे सरांच्या सेवाकाळातील योगदानाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. “चहांदे सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान होते,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. मुख्याध्यापक लोखंडे सर यांनीही त्यांचा कार्याचा आढावा घेत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी चहांदे सरांना सर्व उपस्थितांच्या वतीने स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात आणि भरलेल्या डोळ्यांतून निरोप घेताना शाळेतील आणि गावातील लोकांच्या मनात त्यांच्या बद्दल अधिकच प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली होती. कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकत्रितपणे “चहांदे सरांना पुढील आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा” देत करण्यात आली.
इंदिरा गांधी विद्यालय पालेबरसा येथे श्री सोपान चहांदे सरांना सेवानिवृत्तीप्रसंगी भावपूर्ण निरोप

0Share
Leave a reply













