SR 24 NEWS

सामाजिक

हरिनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला, देवगाव शनी येथे अखंड हरिनाम सप्ताहास मिरवणूक व शोभायात्रेने उत्साही प्रारंभ

Spread the love

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / जीतू शिंदे : योगीराज सद्‌गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला आज भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. गोदावरीधाम (सरला) चे मठाधिपती महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत, भव्य मिरवणूक व शोभायात्रेने सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. ही मिरवणूक सकाळी ११.३० वाजता बाजाठाण येथील श्री आशुतोष महादेव मंदिरापासून प्रारंभ झाली. टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाच्या जयघोषांचे निनाद, रंगीबेरंगी चित्ररथ, वारकरी मंडळी, विद्यार्थी, तरुण मंडळे यांच्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.

या शोभायात्रेत सप्तक्रोशी व पंचक्रोशीतील गावांनी विविध अध्यात्मिक विषयांवर आधारित चित्ररथ सादर करून आपल्या श्रद्धेचे दर्शन घडवले. भामठाण येथील वारकरी मंडळींनी ‘सरला बेट ते अवलगाव’ या दरम्यान मोटारसायकल रॅली काढून कार्यक्रमात उत्साह वाढवला. सप्ताहस्थळी पोहोचताच “गंगागिरी महाराज की जय”, “रामगिरी महाराज की जय” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी भक्तांचा उसळलेला उत्साह व भक्तिपूर्ण वातावरण मनाला भावणारे ठरले.

उद्घाटन प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार रमेश बोरणारे, तसेच मधुकर महाराज, हरिशरण महाराज, संदीप महाराज, योगानंद महाराज, माऊली महाराज, रंजळे महाराज, मधुसूदन महाराज, बहिरट महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, पंकज ठोंबरे, बाबासाहेब चिडे, अविनाश गलांडे, ज्ञानेश्वर व वंदना मुरकुटे यांचाही विशेष सहभाग होता.

कृषी मंत्री कोकाटे यांनी यावेळी रामगिरी महाराजांचे संतपूजन केले. त्यांनी सांगितले की, “१७७ वा सप्ताह आमच्याकडे झाला. जे महाराजांनी सांगितले, ते आम्ही पूर्णत्वास नेले. आज सात गावांनी उत्कृष्ट नियोजन करून १७८ व्या सप्ताहाच्या प्रारंभालाच आदर्श घालून दिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्या, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, असेही आवाहन केले. आमदार रमेश बोरणारे यांनी देखील सप्ताहाचे व सहभाग गावांचे कौतुक करत संघटनशक्ती व भक्तिभावाचे दर्शन घडल्याचे सांगितले. प्रारंभिक प्रस्ताविक मधु महाराज यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!