चंद्रपूर प्रतिनिधी / रोशन खानपुरे : सिंदेवाही शहरातील प्राजक्ता कॉन्व्हेंटजवळील लेडारी तलावात मृत मास्यांमुळे पसरलेल्या दुर्गंधीची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर नगराध्यक्ष भास्कर नन्नावार यांनी तातडीने भेट देऊन कारवाईचे आदेश दिले. यावेळी उपनगराध्यक्ष सीमा रामटेके, नगरसेवक दिलीप रामटेके, मच्छी पालन सोसायटीचे पदाधिकारी, तसेच स्थानिक नागरिकांनी तलाव परिसराची पाहणी केली. पंचशील मच्छी पालन सोसायटीकडून तलावातील मृत मासे उचलण्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सोसायटीचे अध्यक्ष रवी मार्बते व उपाध्यक्ष विठ्ठल मेश्राम यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, “गावातील सांडपाणी थेट तलावात मिसळत असल्यामुळे पाणी गंभीर स्वरूपात दूषित झाले आहे. परिणामी शेकडो मासे मृतावस्थेत सापडले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्यधोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ”स्थानिक नागरिकांच्या मते, ही केवळ तात्पुरती कारवाई असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे.
तलावात सांडपाणी जाण्याचा मार्ग थांबवणे, व पाण्याचा निचरा सुरळीत करणे, ही प्रशासनासमोरची मुख्य आव्हाने आहेत.मात्र नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत: प्रशासनाने दिलेले कारवाईचे आदेश पूर्णपणे अमलात येणार का? आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही याची खात्री प्रशासन देणार का?
लेडारी तलावातील दुर्गंधीप्रकरणी प्रशासन सतर्क – नगराध्यक्ष नन्नावार यांचे तात्काळ कारवाईचे आदेश, शेकडो मासे मृतावस्थेत; दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गडद संकट

0Share
Leave a reply












