SR 24 NEWS

राजकीय

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहारगृहाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

राहुरी (प्रतिनिधी) २७ जुलै :  राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुविधा व आर्थिक पाठबळ देण्याचे सरकारचे स्पष्ट धोरण आहे. या दिशेने पावले उचलण्यात येत असून, यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार लहू कानडे, कैलास पाटील, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. केरू पानसरे, बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे, हर्ष तनपुरे, राजेंद्र नागवडे, अशोक सावंत, कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असून त्या काटकसरीने आणि पारदर्शक पद्धतीने चालविल्या गेल्या पाहिजेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून शेती उत्पादनात वाढ साधण्यासाठी सरकारने ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.फळबाग लागवड, तीन पिकांनंतर ऊसाच्या बियाण्यांमध्ये बदल, शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा नव्या पिढीने विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने ३ लाखांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुढील पाच वर्षात शेतकरी कल्याणासाठी २५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत मासिक मानधन आता दीड हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्यात आले आहे. लाडकी बहिण योजना या अर्थसंकल्पात ४५ हजार कोटींच्या निधीसह लागू करण्यात आली असून केवळ अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे.

राहुरी बाजार समितीचे कौतुक करत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये राहुरीचा समावेश होतो. येत्या काळात वाबूरी येथे १५ एकर क्षेत्रात अद्ययावत जिनिंग मिल सुरू होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी प्रास्ताविक करत शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीचे काम १ कोटी ८० लाख रुपये खर्चून पूर्ण झाल्याची माहिती दिली. सध्या बाजार समितीकडे १९ कोटी रुपयांचे ठेवी आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!