राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वांबोरी (ता. राहुरी) येथील स्वामी समर्थ नगर येथे 19 जून 2025 रोजी मध्यरात्री सुमारे 12.45 ते 1.00 दरम्यान दोन घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गु.र.नं. 685/2025 भारतीय दंड संहितेच्या कलम 309(6), 331(8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फिर्यादीच्या घरातून 80,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 11,000 रुपये रोख, तर शेजारच्या घरातून कडीकोंडा तोडून 68,985 रुपयांचे दागिने, 20,000 रुपये रोख व इतर 19,000 रुपयांचे साहित्य असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत राहुरी पोलिसांनी आरोपी अजय मिरीलाल काळे (वय 25, रा. मक्तापूर, ता. नेवासा) याला 22 जून रोजी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉन मोटारसायकल (चेसिस क्र. ME4KC401CMA236609) व लाकडी दांडा हस्तगत करण्यात आला. त्यानंतर 8 जुलै रोजी दुसरा आरोपी उमेश हारसिंग भोसले (वय 25, रा. डिगी, ता. नेवासा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 4,000 रुपयांची रोख रक्कम, लोखंडी पाईप, आणि लाकडी मुठ असलेली लोखंडी कट्टी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीविरुद्ध आता भारतीय दंड संहितेच्या कलम 310(2) नुसार गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली आहे.
या कारवाईस मा.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. समाधान फडोळ, पो.उ.नि. राजु जाधव, पोहेकॉ संजय राठोड, सुरज गायकवाड, राहुल यादव, पोना सुनील निकम, पोकॉ रविंद्र कांबळे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, अंकुश भोसले, सतीश कु-हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
Leave a reply













