राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसादनगरमध्ये खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात स्थानिक महिलांनी शुक्रवारी सकाळी थेट कारवाई करत दारू विकणाऱ्या सुगंधाबाई प्रेमा पवार हिला रंगेहात पकडले आणि पोलिसांना पाचारण केले.महिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, हे काम पोलिसांनी न करता महिलांनी करून दाखवल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
घटनास्थळी बीट हवालदार बाबासाहेब शेळके पोहोचले असता, संतप्त महिलांनी त्यांच्यावर ताशेरे ओढत प्रश्नांचा भडीमार केला. या गोंधळादरम्यान, छायाचित्रण करणाऱ्या स्थानिक पत्रकार जालिंदर अल्हाट यांचा मोबाईल शेळके यांनी हिसकावून घेतला आणि छायाचित्रण करू नका, असे सांगत त्यांना धमकावले. या कृतीमुळे पत्रकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
स्थानिक महिलांनी आरोप केला की, या परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री堂 सुरू आहे. याआधीही त्यांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देत हा व्यवसाय त्वरित बंद करण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.दारूमुळे अनेक तरुण व्यसनाधीन झाले असून, काहींचे मृत्यूही झाले आहेत. यापुढे जर दारूमुळे एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याचा अंत्यविधी थेट राहुरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांच्या दालनासमोर करू, असा थेट इशाराही महिलांनी दिला आहे.
या आंदोलनात शरद साळवे, लैला शेख, परवीन शेख, रेखा जाधव, सुनिता पवार, रुथ कांबळे, मंगल थोरात, सविता बनसोडे, रोशन शेख, स्वार्थाबाई जाधव, जैतून भाभी, माया साठे, लता जगताप, अलका पठारे, लता साळवे, येलनबाई गायकवाड, परिगा सरोदे, अंजू बोर्डे, पल्लवी पवार, रंगूबाई मोकळ, लक्ष्मीबाई पंडित, कविता साळवे आदी महिलांचा सहभाग होता.
या प्रकरणाकडे पोलिस प्रशासन गंभीरतेने लक्ष देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राहुरी फॅक्टरीत अवैध दारू विक्रीचा महिलांकडून पर्दाफाश ; पोलिसांच्या भूमिकेवर संतप्त सवाल

0Share
Leave a reply











