राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : अहिल्यानगर जिल्ह्यात हिंदू धर्मीयांच्या सक्तीच्या धर्मांतराच्या वाढत्या घटनांवर निषेध व्यक्त करत हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजता राहुरी तहसील कार्यालयात तहसीलदार नामदेव पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, गरीब व अशिक्षित हिंदूंना आर्थिक प्रलोभने, अंधश्रद्धा, उपचाराच्या बहाण्यांद्वारे मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात येत आहे. हिंदू देवी-देवतांची विटंबना करून, त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान केला जात असून, हा प्रकार नियोजित पद्धतीने आणि एका मोठ्या रॅकेटच्या माध्यमातून घडवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये सहभागी असलेले फादर, पास्टर, मिशनरी संघटनांचे प्रतिनिधी तसेच धर्मांतर घडवून आणणारे इतर व्यक्ती यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाने ‘धर्मांतर बंदी कायदा’ तातडीने लागू करून सक्तीने होणाऱ्या धर्मांतराला पूर्णविराम द्यावा, अशीही आग्रही मागणी यामधून व्यक्त करण्यात आली.
निवेदन देताना टाळ-मृदंगाच्या गजरात मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी तहसील कार्यालयात हजेरी लावली होती. यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के, ह.भ.प. सुनील महाराज पवार, ह.भ.प. अशोक महाराज भोसले, ह.भ.प. खाटेकर महाराज, ह.भ.प. पारे महाराज, ह.भ.प. कृष्णा महाराज जिरेकर आदी कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकर्ते उपस्थित होते.
Leave a reply













