राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : जैवविविधता जपण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षारोपणामुळे मातीची धूप थांबून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठांतर्गत असलेल्या डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागांतर्गत वनमहोत्सव 2025 आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी वृक्षरोपण करतांना अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, डॉ. विक्रम कड, डॉ. विरेंद्र बारई, सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. रविंद्र बनसोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक करतांना डॉ. सचिन नांदगुडे म्हणाले की या पाणलोट क्षेत्राचा परिसर 1200 हेक्टरचा आहे. या 1200 हेक्टरवर पाणी साचवून ठेवण्यासाठी खोल सलग समतल चर, बंदिस्त वाफे, नाला बंडींग करण्यात आलेले असून त्यामुळे या क्षेत्रात 123.40 टी.सी.एम. पाणी अडवले व जमिनीत मुरवले जात आहे. या पाणलोट क्षेत्रामध्ये यावर्षीच्या वनमहोत्सवात एक हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
यामध्ये 600 बांबू व आवळा, जांभूळ व आंबा या 400 झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्वागत व आभार डॉ. विरेंद्र बारई यांनी केले. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी वृक्षारोपण केले. हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये डॉ. संगिता शिंदे, सुनील साळुंके, संतोष कहार, राहुल राजपुत व ज्ञानेश्वर मोरे यांनी परिश्रम घेतले.
Leave a reply












