श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : लोकसभा निवडणुकीच्या निकालात 300 पेक्षा जास्त जागा जिंकून केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. सरकार आल्यानंतर शेतीच्या खतावरील जीएसटी रद्द करण्यासोबत शेतमालाला हमीभाव देणार असल्याची ग्वाही ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली. श्रीरामपुरात बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, सध्या देशामध्ये अघोषित हुकूमशाही आहे. तिला हातामध्ये मशाल घेऊन जाळून टाकण्याची वेळ आली आहे. शेतकर्यांनी आपल्या हक्कासाठी केलेले आंदोलन बळाचा वापर करुन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतमालाला भाव नाही, विशेषत: महाराष्ट्रातील शेतकर्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. निर्यातबंदी आणून कांद्याचे भाव पाडले गेले. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांचे सुमारे अकरा हजार कोटींचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या. करोना काळामध्ये खर्या अर्थाने देश वाचविला असेल तो येथील शेतकर्यांनी. सर्व देशाला अन्नधान्य पुरविण्याचे काम या अन्नदात्याने केले आणि आता त्याचीच अवस्था भाजप सरकारने बिकट करुन टाकली आहे.
शेतकर्याला देशोधडीला लावले आहे. त्यामुळे सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. सध्या देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान केंद्रातील भाजप सरकारला बदलायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
Leave a reply













