यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : पोलिस के हाथ बहुत लंबे होते है, आरोपी कितीही चतूर असला तरी तो एक ना एक दिवस पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच, असे म्हटले जाते. याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. २००४ मध्ये लाखो रुपयांचा शेतमाल खरेदी करून मोबदला न देताच फरार झालेल्या एका भामट्यास दारव्हा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. दिनेश मानसिंग जाधव रा. आर्णी असे या आरोपीचे नाव आहे.
२००४ मध्ये दारव्हा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाची त्याने खरेदी केली. मात्र, मोबदला देण्याची वेळ आली, तेव्हा त्याने पळ काढला. अखेर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दारव्हा ठाणे गाठून तक्रार दिली. या फिर्यादीवरून आरोपी दिनेश विरोधात भादंवि कलम ४०६, ४२० प्रमाणे दारव्हा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो आढळला नाही. यावर पोलिसांनी दारव्हा न्यायालयात २९९ सीआरपीसीप्रमाणे दोषारोपत्र दाखल केले. यावर न्यायालयाने आरोपीस फरार घोषित केले. त्यानंतरही आरोपीचा शोध सुरू होता.
दरम्यान, ६ जुलै रोजी आरोपी दिनेश हा यवतमाळमध्ये आल्याची माहिती दारव्हा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांना मिळाली. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सुरेश राठोड, ओंकार गायकवाड, निखील इंगोले, सलीम पठाण आदींनी यवतमाळ येथून दिनेशला उचलले. या प्रकरणाचा आता अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी हे करीत आहेत.
Leave a reply













