श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवरील जुन्या ओझा पेट्रोल पंपाजवळ किराणा व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून आणि डोळ्यात मिरची पूड फेकून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश फत्तेचंद बाफना (वय ५५, रा. लबडे वस्ती, श्रीरामपूर) हे मंगळवार, २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता आपले होलसेल किराणा दुकान बंद करून घरी जात होते. त्यांच्या जवळ दिवसभराच्या गल्ल्यातील सुमारे ८ हजार रुपयांची रोकड होती. ते स्वतःच्या मालवाहतूक रिक्षातून (MH 20 A 5543) जात असताना जुन्या ओझा पेट्रोल पंपाजवळ लघुशंकेसाठी थांबले होते.
याचवेळी दोन अज्ञात इसम तिथे आले. त्यातील एकाने बाफना यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना धमकावले, तर दुसऱ्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बाफना जखमी झाले. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या शर्टच्या खिशातील ८ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली.बाफना यांनी आरडाओरड केली असता दोन्ही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिखरे व पोलीस उपनिरीक्षक मगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्रीरामपूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मगरे करीत आहेत.
श्रीरामपुरात व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लूट; डोळ्यात मिरची पूड फेकून ८ हजारांची रोकड लंपास

0Share
Leave a reply












