राहुरी ग्रामीण प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता सदर मुलगी अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये परीक्षा (पेपर) देण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे व संभाव्य ठिकाणी शोध घेतला, परंतु मुलगी मिळून आली नाही.
दरम्यान, कोणीतरी अज्ञात इसमाने मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून स्वतःच्या फायद्यासाठी पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करत फिर्यादीने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीवरून राहुरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील निकम हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, बेपत्ता मुलीबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
धामोरी येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात इसमाविरुद्ध राहुरी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












