नेवासा प्रतिनिधी / मोहन शेगर : नेवासा तालुक्यातील चांदा येथे कंदुरी कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार करून तरुणाचा खून करणाऱ्या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी शाहिद राजमहंमद शेख (वय २२, रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) हा आपल्या मित्रांसह चांदा परिसरात कंदुरी कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रमादरम्यान शाहिद शेख याचा सुरज लतीफ शेख व अक्षय बाळू जाधव यांच्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर घटनेत होऊन आरोपींनी शाहिद शेख यांच्या छातीत गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. या गोळीबारात शाहिद शेख याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी फिर्यादी यासीन इब्राहिम शेख (रा. चांदा) यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५) तसेच आर्म्स ॲक्ट ३/२५, ७, २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन विशेष पथके रवाना केली.
गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी मुख्य आरोपी सुरज लतीफ शेख (वय २४, रा. चांदा) हा बाभळेश्वर (ता. राहाता) परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी सापळा रचत संशयितास पाहताच पाठलाग केला. सुमारे एक किलोमीटर पाठलागानंतर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने आर्थिक व्यवहार व वादाच्या कारणावरून आपल्या साथीदारांसह शाहिद शेख याचा खून केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील इतर आरोपी अक्षय बाळू जाधव व सुरज कैलास उबाळे हे अद्याप फरार असून, गुन्ह्यात वापरलेल्या गावठी कट्ट्याचा शोध सुरू आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली आहे
चांदा येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करून खून करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई ; दोन आरोपी फरार

0Share
Leave a reply












