बाभुळगाव प्रतिनिधी /रावसाहेब पाटोळे : बाभुळगाव येथील प्रगतीशील शेतकरी श्री. दत्तात्रय बाबुराव पाटोळे यांचे चिरंजीव प्रज्वल दत्तात्रय पाटोळे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत आहे. अपार मेहनत, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील या तरुणाने सैन्यभरतीत यश संपादन केल्याने गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
“जय जवान, जय किसान” हा नारा प्रत्यक्षात सिद्ध करत किसानपुत्र प्रज्वल पाटोळे देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी सज्ज झाला आहे. देशसेवा करणे हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. त्या स्वप्नपूर्तीसाठी हजारो तरुण सैन्यभरतीसाठी प्रयत्न करतात; त्यापैकी निवड होणारे तरुण खऱ्या अर्थाने भाग्यवान ठरतात.
बाभुळगावात सैन्यभरतीची परंपरा असून, मोजकेच का असेना पण गावातील सैनिक तरुण आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. याच प्रेरणेतून प्रज्वल पाटोळे यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशामुळे समस्त गावकऱ्यांना अभिमान वाटत असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाटोळे कुटुंबीयांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून प्रज्वल यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Leave a reply













