तुळजापूर चंद्रकांत / हगलगुंडे : मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे वाचनाची सवय कमी होत चालली असली, तरी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची सुस्पष्ट माहिती मिळवण्यासाठी दैनिक वाचन अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री श्री रविशंकर विद्या मंदिर व श्री श्री गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र कानडे यांनी केले.दर्पण दिनाचे औचित्य साधून अणदूर येथील सर्व माध्यम प्रतिनिधींच्या सत्कार समारंभाचे आयोजन श्री श्री गुरुकुल शाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
डॉ. कानडे पुढे म्हणाले की, समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आज प्रसारमाध्यमे करत आहेत. दिवसेंदिवस बिघडत चाललेली सामाजिक व्यवस्था सुधारण्याचे मोठे कार्य माध्यम प्रतिनिधी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी मोलाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातील पहिले दैनिक ‘दर्पण’ सुरू करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो, असेही त्यांनी नमूद केले.
आगामी काळ हा स्पर्धेचा असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर पुस्तकांसोबतच दैनंदिन उपलब्ध असलेली दैनिके नियमित वाचावीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी निश्चितच सुलभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याग, समर्पण आणि उदात्त भावना ठेवून एखादा उपक्रम राबविल्यास तो नक्कीच यशस्वी होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री श्री गुरुकुल शाळा असून, चौदा वर्षांपूर्वी सुरू झालेली ही शाळा आज वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. हे विद्यार्थ्यांनी व पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचे फलित आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राजकुमार स्वामी, शिवशंकर तिरगुळे, दयानंद काळुंके व गुरुनाथ कबाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व माध्यम प्रतिनिधींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, डायरी व आकर्षक भेटवस्तू देऊन डॉ. कानडे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक लक्ष्मण नरे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बंडगर यांनी केले, तर शिवराज भुजबळ यांनी आभार मानले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. हरिदास मुंडे, डॉ. रूपाली कानडे, तसेच माध्यम प्रतिनिधी चंद्रकांत हगलगुंडे, चंद्रकांत गुड्ड, नागेश करपे, संजीव आलुरे, लक्ष्मण दुपारगुडे, सचिन तोग्गी, प्रसन्न कंदले, राहुल कांबळे, आकाश अलकुंटे, आर. एस. गायकवाड, श्रीकांत अणदुरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम्ने करण्यात आली.
Leave a reply













