तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : कृष्णा खोरेच्या हक्काच्या पाण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा करून शेतकऱ्यांचे उत्पन्न किमान दुप्पट करण्यासोबतच उद्योग, व्यवसाय, पर्यटन विकास व रोजगार निर्मितीवर अधिकाधिक भर देणार असल्याची ग्वाही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ९.३० वाजता तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अण्णा चौकात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता, पथदिवे आदी विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, नळदुर्ग नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष बसवराज धरणे, कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूरचे माजी अध्यक्ष सचिन पाटील, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, बाजार समितीचे अध्यक्ष आशिष सोनटक्के, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे, अणदूर शहराध्यक्ष दीपक घोडके, भाजप नेते विजय शिंगाडे, माजी सरपंच धनराज मुळे, सिद्धू कोरे, साहेबराव घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील पुढे म्हणाले की, बारा मल्हार मार्तंडांपैकी अणदूर–नळदुर्ग येथील पवित्र खंडोबा देवस्थान हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून, या देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पर्यटन विकासाच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आमचा ठाम मानस आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळवून विकासाचा अजेंडा राबवून मागासलेपण दूर करण्यात येईल. तसेच प्रलंबित नळदुर्ग तालुका निर्मितीसाठीही सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी अणदूरच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल ॲड. दीपक आलुरे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, धनराज मुळे, दीपक घोडके, साहेबराव घुगे व दयानंद मुडके यांच्या हस्ते आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड. दीपक आलुरे यांनी गेल्या आठ वर्षांत ग्रामीण भागात भाजपाचे कार्यकर्ते संघर्ष करत कमळ चिन्ह घरोघरी पोहोचवत असल्याचे सांगितले. अणदूरच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा निधी मिळाल्याने मुख्य रस्ता व पथदिवे प्रत्यक्षात येऊ शकले, असे त्यांनी नमूद केले. तसेच जुना सरकारी दवाखान्याच्या जागेवर प्रशासकीय भवन उभारून नऊ शासकीय कार्यालये एका छताखाली आणल्यास अणदूरची बाजारपेठ पुन्हा भरभराटीला येईल, यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आमदार पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आमदार पाटील यांचे आगमन उशिरा झाल्याने कार्यक्रम रात्री साडेदहा वाजता संपला, तरीही कडाक्याच्या थंडीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. आमदार पाटील यांच्या आगमनानंतर सिमेंट रस्ता व पथदिव्यांचे लोकार्पण तसेच अण्णा चौकातील ध्वजस्तंभाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सुमारे पंधरा मिनिटे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. परिसरातील विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply













