अणदुर प्रतिनिधी/ चंद्रकांत हगलगुंडे : वाममार्गाने मिळवलेली संपत्ती ही तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाते तर सन्मार्गाने मिळालेली संपत्ती ही सुख-समृद्धी , सन्मान आणि वैभवाकडे घेऊन जाते. समाजातील अडचणी समस्या सत्तेत मांडून पत्रकाराने आरशाची भूमिका बजावून राज्यकर्त्यानी दिशा देण्याचे काम करावे असे मत अणदूरचे सरपंच तथा शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव रामचंद्र आलुरे यांनी व्यक्त केले .
दर्पण दिनाचे औचित्य साधून अणदुर ग्रामपंचायतींच्या वतीने येथील सर्व पत्रकारांच्या सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते .पुढे बोलताना रामचंद्र आलुरे म्हणाले की खोटी बातमी किंवा खात्री न करता केलेली बातमी ही अनेकांची मने दुखावते . त्यासाठी बातमीची अगोदर खात्री करणे हे गरजेचे आहे. एकांगी बाजू न घेता , कोणाकडे बोट न दाखवता , निस्पृह , निस्वार्थ भावनेने पत्रकारिता करणे काळाची गरज असल्याचे सांगून अणदूर या गावाला शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक असा मोठा वारसा आहे . हा नावलौकिक महाराष्ट्रामध्ये पसरविण्यात अणदुर येथील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीचे मोठे योगदान आहे असे सांगून दर्पण म्हणजेच समाज मनाचा आरसा . त्या आरशाची प्रतिमा सर्व पत्रकारांनी जपणे गरजेचे असल्याचे सांगितले .
याप्रसंगी अणदुर येथील सर्व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य डॉ . जितेंद्र कानडे यांनी केले .याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे , डॉ . विवेक बिराजदार अनिता घुगरे , ग्रामविकास अधिकारी संजय माशाळे, माजी सरपंच प्रबोध कांबळे यांच्यासह सर्व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते .
Leave a reply













